सिंह आणि राजकन्या
गोष्ट तशी सर्वांना माहिती आहे. जंगलाचा राजा सिंह एकदा एका तळ्याकाठी आराम करीत असतो. त्याला दुपारच्या वेळी तळ्याजवळ गलका ऐकू येतो, म्हणून तो हळूच बघतो तर अनेक महिला तळ्यात जलक्रीडा करीत होत्या. त्यातील एक लावण्यवती बघून तो घायाळ झाला. ही लावण्यवती आपली राणी असली पाहिजे. या जंगलातील प्राण्यांना याच्यापेक्षा चांगली राणी शोभणार नाही, असा विचार करून तो तिच्याशीच लग्न करण्याचा निर्धार करतो. तातडीने तो आपल्या प्रधान कम सल्लागाराला बोलावून घेतो. त्याच्याजवळ आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवतोे. प्रधानही खूशमस्कर्या असल्याने तो ऐ ऐटीत सांगतो, महाराज काळजी करू नका. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करणे ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे कुठलीही किंमत चुकवावी लागली तरी त्या लावण्यवतीला मी तुमची राणी बनवणार म्हणजे बनवणारच, असा शब्द देतो. तोपर्यंत तळ्यातील जलक्रीडा झाल्यानंतर ती लावण्यवती व तिच्या मैत्रीणी परतीच्या मार्गाला निघाल्या. त्यांच्या पाठोपाठ महाराजांचा प्रधानही जाऊ लागला. ती लावण्यवती म्हणजे त्या राज्याची लाडकी व एकुलती एक कन्या होती. ती राजमहालात गेल्यानंतर प्रधानजी तेथून माघारी फिरले. त्यांनी जंगलात येऊन महाराजांना सांगितले की, महाराज ती राजकन्या आहे. यामुळे हा सोयरेसंबंध अगदी तोलामोलाच्या राजघराण्याशीच होणार आहे. जंगलच्या राजाशी संंबध जोडायला कुणाला आवडणार नाही. प्रधानजींच्या बोलण्याने महाराजही खूश झाले. त्यांनी दुसर्याच दिवशी या विवाहाबाबत राजाशी बोलणी करण्याचे फर्मान सोडले. दुसर्या दिवशी प्रधान राजवाड्यात गेले. जंगलाच्या राज्यातील हा प्रधान थेट दरबारात आल्याने सगळेच क्षणभर दचकून गेले; परंतु प्रधानजीने खुलासा केला की, घाबरण्याचे कारण नाही. मी या राज्याच्या राजकन्येच्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे. आमचे जंगलाचे महाराजांच्या मनात आपल्या राजकन्येशी विवाह करण्याची इच्छा झाली आहे. त्याचे ते बोलणे ऐकून राजसभा स्तंभीत झाली. महाराजही गोंधळून गेले. मात्र, त्या राज्याचाही प्रधान हुशार होता. त्याने महाराजांच्या कानात जाऊन विवाहाला होकार कळवण्याचा सल्ला दिला. यामुळे महाराज म्हणाले, जंगलच्या राजाशी आमचे सोयरेसंबंध होत असतील, तर यापेक्षा मोठे भाग्य नाही. त्यामुळे आम्ही या विवाहास तयार आहोत. तुमच्या महाराजांना आमचा होकार कळवा. आनंदाने उड्या मारत जंगलराज्याचे प्रधान सिंह महाराजांजवळ गेले. त्यांना राजकन्येचा विवाह लावून देण्यास राजा तयार असल्याचे सांगून केवळ मी वर्षानुवर्षे त्यांच्याशी संबंध टिकवल्यामुळेच हा विवाह होत असल्याचेही ठोकून दिले. महाराजांनी विवाहाची बोलणी करण्यासाठी दुसर्याच दिवशी प्रधानाला नगरीत पाठवले. प्रधान उड्या मारत गेला. तेथे जाताच राजाने त्याचे समारंभपूर्वक स्वागत केले. जंगलच्या प्रधानाने लग्नाची बोलणी करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. नगरातील महाराज म्हणाले, प्रधानजी तुमच्या महाराजांचे आधी लग्न झाले आहे की ते अविवाहित आहेत? प्रधान म्हणाले, असे कसे महाराजांचा आधीचा संसार सुखात चालू आहे. त्यावर महाराज उत्तरले मग त्यांना आधी घटस्फोट घेण्यास सांगा. त्यानंतरच लग्नाची बोलणी होईल. प्रधानाने जाऊन जंगलाच्या राजाला हा निरोप दिला. सिंहाने थोडा विचार केला, पण त्या लावण्यवतीची भुरळ पडलेल्या सिंहाने पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याची तयारी दर्शवली. मात्र, घटस्फोट द्यायचा तर काहीतरी खुसपट काढावे लागेल. म्हणून सिंहाने सिंहीनीशी तू करून आणलेली शिकार मला अपुरी पडते. त्यामुळे मला तुझ्यासोबत राहायचे नाही, असे सांगितले. सिंहिनीलाही आश्चर्य वाटले. आतापर्यंत आयत्या शिकारीवर ताव मारणार्या या आळशी सिंहाला नक्कीच नवी राणी मिळणार असल्याची तिला खात्री झाली. तिच्याकडील गुप्तचरांकडून तिने माहिती घेतली, तर शेजारच्या नगरीतील राजकन्येशी लग्न करण्यासाठी याला घटस्फोट पाहिजे असल्याची माहिती समोर आली. तिनेही या राजाची गंमत बघण्यासाठी घटस्फोट देण्याची तयारी दर्शवली. महाराजांनी घटस्फोट घेतल्याचा निरोप घेऊन प्रधान नगरीत गेला. तेथे लग्नाच्या बोलणीला सुरुवात झाली. महाराज म्हणाले, आणखी पंधरा दिवसांमध्ये आपण येथेच राजवाड्यामध्ये लग्नाचा बार उडवून देऊ. आमची राजकन्याही या विवाहास तयार असून त्यासाठी तिच्या दोन अटी आहेत. त्या अटी राजकन्या प्रत्यक्ष सिंह महाराजांनाच सांगणार आहे. यामुळे त्यांनी राजवाड्यात यावेेे, असे तिचे म्हणणे आहे. जंगलाच्या प्रधानाने तातडीने तो निरोप सिंहाला दिला. सिंहही खुशीत गाजरे खात राजवाड्याकडे निघाला. सिंह नगरात आल्याने नगरवासीयांची एकच धावपळ उडाली. सगळे जण घरांमध्ये लपून खिडक्या व दरवाजांच्या फटींमधून रुबाबदारपणे राजवाड्याकडे चाललेल्या सिंहाकडे कुतुहल व भीतीने बघत होते. राजवाड्यात एका पडद्याआड राजकन्या बसलेली असल्याचे सिंहाला सांगितले. सिंहाने विचारले, बोल राजकन्ये तुझ्या काय अटी आहेत. त्यावर पडद्याआडून आवाज आला, महाराज तुम्हाला आलिंगन देण्याची माझी खूप इच्छा आहे, पण तुमच्या नख्यांची आणि दातांची मला खूप भीती वाटते. त्यामुळे माझ्यासाठी तेवढे काढून तुम्ही विवाहासाठी आलात तर मला खूप आनंद होईल. राजकन्येच्या लाघवी बोलण्याने घायाळ झालेल्या सिंहाने आनंदाने नखे व दात काढण्याची तयारी दर्शवली. राजानेही पंधरा दिवसांनी थेट बोहोल्यावर चढण्यासाठीच या, असा सांगत सिंहाला निरोप दिला. इकडे जंगलात आल्यानंतर लावण्यवती मिळवण्याच्या अभिलाषेने सिंहाने नखे काढून टाकली. दात पाडून घेतले. जंगलच्या राजाचा रुबाब उतरून तो आता दीनवाना दिसत होता. यामुळे जंगलातले प्राणी हळहळत होते. मात्र, राजाला त्याची पर्वा नव्हती. कुठलीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण राजकन्या मिळवणारच,यावर तो ठाम होता. लग्नाचा दिवस उजाडला. दात आणि नखे नसलेला सिंह नगरात आलेला बघून नगरवासीय कुतुहलाने रस्त्याच्या कडेला उभे राहिले. कुणी आरडा-ओरड करून वेगवेगळे आवाज काढून त्याची हेटाळणी करीत होते. मात्र, राजकन्येच्या प्रेमात बुडालेला सिंह कशाकडेही लक्ष द्यायला तयार नव्हता. तो राजवाड्यात गेला. तेथे लग्नाची पूर्ण तयारी झालेली होती. सनई चौघड्याचे सूर कानावर पडत होते. पै पाहुणे जमले होेते. वराचे आगमण होताच, त्यांचा मानपान करण्यात आला. लग्न घटिका जवळ आली तरीही राजकन्या बोहल्यावर येत नाही म्हणून धीर सुटलेला सिंह राजाकडे गेला. राजकन्या कुठे आहे, अशी त्याने विचारणा केली. आत जाऊन पाहतो, असे सांगून तेथून निसटलेला राजा राजकन्येचा निरोप घेऊन आला. राजा म्हणाले, सिंह महाराज आमच्या राजकन्येने तुम्हाला येताना छतावरून बघितले. तेव्हा तुमची आयाळ तिला दिसली. तुमची राकट आयाळ तिच्या नाजूक व कोमल शरीराला सहन होणार नाही, असे तिचे म्हणणे आहे. यामुळे तुम्ही ती आयाळ भादरून टाकावी, अशी तिची इच्छा आहे. बाकी ती लग्नाच्या पूर्ण तयारीत आहे. राजाचे बोलणे ऐकून सिंह तसाच जंगलाकडे पळत गेला. मुहुर्त टळू नये म्हणून घाईघाईने त्याने आयाळ कापून घेतली आणि पुन्हा नगराकडे निघाला होता. आयाळ नसलेला हा सिंह बघून जंगलातील कोल्हे-कुत्रेही आता सिंहाकडे बघून हसत होते. नगराच्या वेशीवर आला तर ग्रामसिंह अर्थात कुत्र्यांनी त्याच्यावर हल्लबोल केला. त्यांना चुकवून कसाबसा सिंह नगरात शिरला. तेथे हा नखे, दात व आयाळ नसलेला सिंह बघून नगरवासीयांना त्याची दया येऊ लागली.
अपूर्ण